*#हे_क्षण_ही_निघून_जातील !*
एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.
बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले. पहाटेला फाशी द्यायचे ठरले.
विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला. मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.
हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोड्या वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली. त्यात एकच वाक्य लिहिले होते,
*"This too shall pass"*
म्हणजे
हाही क्षण निघून जाईल"
केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले. आश्चर्य घडले, सैनिक तेथपर्यंत पोहचले. त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले.
राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.
विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की, महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत. त्याने अदबीने विचारले,
'महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे'.
राजा म्हणाला, नाही, आता मला *बुद्धाचा अनित्यता वादाचा* अर्थ व सामर्थ्य कळले आहे. *"जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही. परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे".* या जगात सुख ही राहात नाही, दुःख ही राहात नाही. हे मला आता समजलेले आहे. म्हणून *"दुःखात खचू नये अन् सुखात नाचू नये."*
This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल. नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.
सद्य परिस्थितीत घाबरुन जाऊ नका, हे तात्पुरते संकट आहे. *This too shall pass !*
*हे क्षणही निघून जातील.*
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know